ASIA CUP 2023, आशिया चषकात भारत-पाकिस्तानविरुद्धचा सामना आज रंगणार, कोणत्या खेळाडूंवर अधिक लक्ष…?

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची (ODI World Cup) रंगीत तालीम म्हणून आशिया चषक स्पर्धेकडे पाहिले जात आहे.

ASIA CUP 2023, आशिया चषकात भारत-पाकिस्तानविरुद्धचा सामना आज रंगणार, कोणत्या खेळाडूंवर अधिक लक्ष…?

रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल (Shubman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे भारताच्या आघाडीच्या फळीतील गुणवान फलंदाज विरुद्ध शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi), नसीम शाह (Naseem Shah) आणि हॅरिस रौफ (Harris Rauf) हे तेजतर्रार मारा करणारे पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज.. या जागतिक दर्जाच्या खेळाडूंमधील द्वंद्व आज, शनिवारी होणाऱ्या आशिया चषक (ASIA CUP 2023) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील सामन्यात पाहायला मिळणार आहे.

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची (ODI World Cup) रंगीत तालीम म्हणून आशिया चषक स्पर्धेकडे पाहिले जात आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान हे तणावपूर्ण संबंध असलेले शेजारी देश आमनेसामने आल्यावर या लढतीला वेगळेच महत्त्व प्राप्त होते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात (Australia) झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात (T- 20 World Cup) भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या लढतीत विराट कोहलीने (Virat Kohli) अविस्मरणीय खेळी करताना भरगच्च असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) भारताला एकहाती विजय मिळवून दिला होता. या खेळीदरम्यान कोहलीने हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर समोरील दिशेने मारलेला ‘तो’ षटकार आजही प्रत्येक क्रिकेटरसिकाच्या लक्षात आहे. कोहलीने या खेळीसह आपल्यातील असाधारण गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली होती. आता अशीच कामगिरी करण्यासाठी रोहित आणि गिलही उत्सुक असतील. पाकिस्तानला विजय मिळवायचा झाल्यास कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) पुन्हा आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आशिया चषकातील पहिल्या सामन्यात नेपाळविरुद्ध (Nepal) पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता. त्या वेळी बाबरने १५१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याला इफ्तिखार अहमद (नाबाद १०९) आणि मोहम्मद रिझवान (४४) यांची साथ लाभली होती. या तिघांचा लय कायम राखण्याचा प्रयत्न असेल. पाकिस्तानची मुख्यत: गोलंदाजांवर भिस्त असेल. शाहीन, नसीम आणि रौफ हे त्रिकूट सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. या तिघांनी मिळून या वर्षी ४९ गडी बाद केले आहेत. त्यांच्यापासून भारताला सावध राहावे लागेल. तसेच लेग-स्पिनर शादाब खानही लयीत आहे.

रोहित आणि गिल भारताच्या डावाची सुरुवात करणे अपेक्षित असून कोहली तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करण्याची शक्यता आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) मुख्य दावेदार आहेत. पाठीच्या दुखापतीतून सावरून पुनरागमन करणारा श्रेयस दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. किशनने यापूर्वी सलामीवीर म्हणून आपली सर्वोत्तम कामगिरी केली असली, तरी केएल राहुलच्या अनुपस्थितीत त्याला मधल्या फळीत खेळावे लागू शकेल. अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी हार्दिक पंडय़ा (Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या अष्टपैलूंवर असेल. तसेच त्यांना गोलंदाजीतही योगदान द्यावे लागेल. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवसह (Kuldeep Yadav) जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) हे वेगवान त्रिकूट या सामन्यात खेळणे अपेक्षित आहे. अंतिम ११मध्ये स्थान मिळाल्यास बुमरा जुलै २०२२ नंतर आपला पहिला एकदिवसीय सामना खेळेल. भारताचा कर्णधार रोहितची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याला चमक दाखवण्यात यश आले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध १६ एकदिवसीय सामन्यांत ५१.४२ची सरासरी आणि ८८.७७च्या स्ट्राइक रेटने ७२० धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु शाहीनविरुद्ध धावा करणे रोहितला यापूर्वी अवघड गेले आहे. २०२१मध्ये अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामन्यात शाहीनने पहिल्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून रोहितला पायचीत पकडले होते. सुरुवातीच्या षटकांत रोहितचे पदलालित्य तितकेसे आश्वासक नसते आणि याच वेळी ‘इन स्विंग’ करणारा शाहीन त्याच्यासाठी घातक ठरू शकतो. मात्र, सुरुवातीची षटके खेळून काढल्यास रोहितला मोठी खेळी करता येऊ शकेल.

आमनेसामने (एकदिवसीय क्रिकेट)

Exit mobile version