FIFA WORLD CUP 2022 :यजमान असलेल्या कतार संघाला मोठा झटका; सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

FIFA WORLD CUP 2022 :यजमान असलेल्या कतार संघाला मोठा झटका; सलग दुसऱ्या सामन्यात पराभव

फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत यजमान कतारचं आव्हान संपुष्टात आलं आहे. यजमान कतारला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. कतार आणि सेनेगल ( Qatar vs Senegal ) यांच्यामधील सामन्यात कतारला पराभव पत्करावा लागला आहे. सलामीच्या सामन्यातही यजमान कतारचा इक्वेडोरने पराभव केला होता. त्यानंतर आता सेनेगल विरुद्धचा सामनाही कतारला जिंकता आलेला नाही. सेनेगलने कतारला ३-१ ने हरवलं आहे. दोहा येथील अल थुमामा स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. सलग दुसऱ्या पराभवामुळे यजमान कतारचं पुढील फेरीत जाण्याचे स्वप्नही भंगलं असून कतार स्पर्धेबाहेर गेलं आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेनेगलने कतारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि पहिल्या १० मिनिटांत आक्रमक खेळी करत २-३ वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या अर्ध्या तासामध्ये सेनेगलचा संघ अधिक वरचढ होता. सेनेगलने कतारला आक्रमणासाठी खूप कमी संधी दिल्या. ४१व्या मिनिटाला पहिला गोल करताना सेनेगलनेही आक्रमण सुरू ठेवलं. कतारच्या गोलरक्षकाला बॉल क्लिअर करता आला नाही आणि स्ट्रायकर बुलाये डियाने स्विफ्ट झेल घेत गोल केला.

सेनेगलकडे मध्यंतराला १-० अशी आघाडी होती. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच फमारा डिएधिओयूने जबरदस्त हेडर मारून गोल करत सेनेगलची आघाडी वाढवली. उत्तरार्धात बदली खेळाडूंचा बोलबाला राहिला. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मोहम्मद मुन्तारीने (७८व्या मिनिटाला) कतारसाठी विश्वचषक स्पर्धेतील पहिला गोल केला. मात्र, त्यांना बरोबरी साधण्यात अपयश आले. ८४व्या मिनिटाला सेनेगलचा बदली खेळाडू बाम्बा डिएंगने सॅब्ली-एन्डीआयेची चाल सार्थकी लावताना सेनेगलचा तिसरा गोल केला.

हे ही वाचा : 

कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील संकट

मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी देण्यासाठी गुवाहाटीला गेले, बुलढाण्याच्या सभेतून संजय राऊतांच्या हल्लाबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version