Happy Birthday Sania Mirza : यशाच्या शिखरांपासून ते वादांच्या खाच खळग्यांपर्यंत सर्व काही अनुभवलं

भारतात जेव्हाही टेनिसचा विषय निघतो आणि त्यातही महिला टेनिसची चर्चा झाली तर एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सानिया मिर्झा (Sania Mirza) .

Happy Birthday Sania Mirza : यशाच्या शिखरांपासून ते वादांच्या खाच खळग्यांपर्यंत सर्व काही अनुभवलं

भारतात जेव्हाही टेनिसचा विषय निघतो आणि त्यातही महिला टेनिसची चर्चा झाली तर एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सानिया मिर्झा (Sania Mirza) . यशाच्या शिखरांपासून ते वादांच्या खाच खळग्यांपर्यंत तिनं सर्व काही अनुभवलं आहे. १५ नोव्हेंबर १९८६ ला हैदराबादमध्ये जन्मलेली सानिया मिर्झा आज वय ३६ वर्षांची झाली आहे. सानिया मिर्झा भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू आहे.

महिला दुहेरीच्या अत्यंत दर्जेदार खेळाडूंपैकी ती एक आहे. महिला एकेरीतही तिनं जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडुंमध्ये सहभागी असलेल्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हा, वेरा ज्वोनारेवा, मारियन बार्तोली आणि अव्वल मानांकित राहिलेल्या मार्टिना हिंगिस, दिनारा सफिना आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांना अनेकदा पराभूत केलं आहे.

साल २००७ मध्ये महिला एकेरीत तिला २७ वं मानांकन मिळालं होतं. त्यानंतर मनगटाच्या दुखापतीनं तिला ग्रासलं आणि केवळ दुहेरीचीच खेळाडू म्हणून तिचा खेळ मर्यादित झाला. दुहेरीमध्ये मात्र तिची कामगिरी चांगलीच यशस्वी ठरली. टेनिस करिअरमध्ये तिनं ४३ दुहेरी किताब जिंकले यावरूनच तिच्या यशस्वी कारकिर्दीचा अंदाज येऊ शकतो. २०१५ मध्ये ती दुहेरीतील जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू होती.

सानिया केवळ ६ वर्षांची असताना तिचे वडील इम्रान मिर्झा यांनी मोठा निर्णय घेतला होता. तो म्हणजे त्यांच्या मुलीला टेनिसपटू बनवण्याचा. त्यांनी महेश भूपती यांच्या वडिलांच्या टेनिस अकॅडमीमध्ये सानिया मिर्झाला टेनिसचं प्राथमिक प्रशिक्षण दिलं. त्यानंतर अनेक प्रशिक्षकांकडून तिनं टेनिसचे धडे गिरवले. त्यात डेवीस कप टीमचे माजी खेळाडू आणि विद्यमान प्रशिक्षक झीशान अली याचे वडील दिवंगत अख्तर अली यांचाही समावेश होता. अख्तर अली स्वतःदेखील भारताचे डेवीस कपमधील खेळाडू आणि कोचही होते. सानियाला लहानपणापासून खेळताना पाहिल्याचं झीशान अली सांगतात. त्यांच्या मते, सानिया ही अत्यंत परिश्रम घेणारी खेळाडू आहे.

“भारतात टॅलेंटची कमतरता नाही. पण एखाद्या खेळाडूमध्ये आग असायला हवी, त्याग आणि बलिदान देण्यासाठी त्यानं सज्ज राहायला हवं. कठिण परिस्थितीत सहन करण्याची क्षमता असावी तीही तारुण्याच्या काळात. ते सर्वकाही सानियामध्ये आहे,” असं झीशान अली म्हणाले होते. एकदा अख्तर अली यांनी आम्हाला सांगितलं होतं की, इतर खेळाडूंप्रमाणे सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झाही त्यांच्याकडे यायचे. पण त्यांनी मुलीला साधारण टेनिसपटू नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू बनवायचं आहे असं सांगितलं होतं. तर इतरांना केवळ मुलांना टेनिस बऱ्यापैकी खेळता यावं असं वाटत होतं. परिणाम सर्वांसमोर आहे, इतरांच्या तुलनेत सानिया कुठच्या कुठे निघून गेली. सानिया मिर्झानं भारतानं एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, आफ्रो एशियन गेम्स यातही अनेक पदकं मिळवून दिली. सुरुवातीला महेश भूपती आणि नंतर लिएंडर पेस आंतरराष्ट्रीय टेनिसच्या पटलावरून हटल्यानंतर सानिया मिर्झाच भारताची टेनिसची ओळख आहे.

कोणत्याही टेनिसपटूच्या यशाचं मूल्यमापन हे त्यानं कारकिर्दीत जिंकलेल्या टेनिस ग्रँडस्लॅमच्या आधारे केलं जातं. सानिया मिर्झासाठी २०१५ हे वर्ष जीवनातील सर्वात आनंदाचं वर्ष ठरलं. तिनं आधी विम्बल्डन आणि नंतर यूएस ओपन ग्रँडस्लॅममध्ये महिला दुहेरीची विजेतेपदकं मिळवली. दोन्ही स्पर्धांत तिची जोडीदार स्वित्झरलँडची मार्टिना हिंगिस होती. त्यानंतर मार्टना हिंगिसच्याच साथीनं तिनं २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचा किताबही जिंकला. सानिया मिर्झानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं २०१५ मध्ये डब्ल्यूटीए फायनल्सचा किताबही जिंकला. त्यापूर्वी तिंनं २०१४ मध्येही झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकच्या साथीनं डब्ल्यूटीए फायनल्सचा किताब जिंकला होता. मिश्र दुहेरीमध्ये सानियानं पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद २००९ मध्ये महेश भूपतीच्या साथीनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकलं होतं. त्यानंतर याच जोडीनं २०१२ मध्ये फ्रेंच ओपनचं विजेतेपद मिळवलं. तर २०१४ मध्ये ब्राझीलच्या ब्रुनो सोआरेसच्या साथीनं तिनं यूएस ओपनचा किताब जिंकला.

हे ही वाचा :

पालकांनो सावधान! मुंबईत बालकांमध्ये गोवरचा धोका अधिक वाढला

महेश बाबूचे वडील कृष्णा यांना हृदयविकाराचा झटका, आईने २ महिन्यांपूर्वी घेतला होता अखेरचा श्वास

दहिसर येथे प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक झाल्यानं खळबळ!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version