भारतीय महिला संघाचा रेकॉर्ड कायम; भारत-पाकिस्तान फायनल होणार?

भारतीय महिला संघाचा रेकॉर्ड कायम; भारत-पाकिस्तान फायनल होणार?

महिला आशिया कपच्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताने थायलंडचा ७४ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारताने थायलंडसमोर १४९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र थायलंडला २० षटकात ९ बाद ७४ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून दिप्ती शर्माने ३ तर राजेश्वरी गायकवाडने २ विकेट्स घेतल्या. फलंदाजीत शफाली वर्माने ४२ धावांची तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ३६ धावांची खेळी केली. आता १५ ऑक्टोबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला हा श्रीलंका आणि पाकिस्तान सामन्यातील विजेत्या संघाशी होईल.

१८ वर्षीय शेफाली वर्मा ही मूळची हरियाणाची असून, तिने तुफानी फलंदाजी केली. तिने १५० च्या स्ट्राईक रेटने खेळताना २८ चेंडूत ४२ धावा केल्या. यादरम्यान शेफालीने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. तिने स्मृती मानधना (१३) सोबत ३८ धावांची सलामीची भागीदारी केली. यानंतर शेफाली आणि जेमिमा रॉड्रिग्ज (२७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी केली. जेमिमाने २६ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही चांगली कामगिरी करत ३० चेंडूंत चार चौकारांसह ३६ धावांचे योगदान दिले. पूजा वस्त्राकर १३ चेंडूत १७ धावा करून नाबाद परतली.

थायलंड संघाचे सुरुवातीलाच ऑफस्पिनर दीप्ती शर्माने कंबरडे मोडले. १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंड संघाने १८ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यष्टिरक्षक एन कोंचारोएनकाई (५), चँथम (४) आणि सोनारिन टिपोच (५) यांना दीप्तीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर रेणुका सिंगने चनिदा सुथिरुआंगला (१) बोल्ड करून संघाची धावसंख्या ४ बाद २१ अशी केली. भारताकडून दीप्ती शर्माने ४ षटकांत ७ धावा देत तीन बळी घेतले. गायकवाडने १० धावा देत दोन गडी बाद केले. रेणुका सिंग, स्नेह राणा आणि शेफाली वर्मा यांनी १-१ विकेट घेतली.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ आमनेसामने येऊ शकतात. दुस-या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेचा महिला संघ आमनेसामने येणार आहे, जो दुपारी सिल्हेटमध्येच खेळवला जाणार आहे. जर पाकिस्तानी संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव केला तर अंतिम फेरीत हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येतील.

हे ही वाचा :

मुंबईत रविवारपासून जमावबंदी

Karwa Chauth 2022 : सौभाग्याच्या रक्षणासाठी केले जाते ‘करवा चौथ’चे व्रत, जाणून घ्या

वनविभागाला मोठे यश; १३ बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version