एमसीएच्या निवडणुकीत कसोटी पटू संदिप पाटील- राजू कुलकर्णी, पवार- शेलार काय करणार?

एमसीएच्या निवडणुकीत कसोटी पटू संदिप पाटील- राजू कुलकर्णी, पवार- शेलार काय करणार?

देशातील नामवंत आणि अग्रगण्य असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? ज्याला मुंबईतल्या क्रिकेट मैदानांची नावेही माहिती नाहीत पण तरीही राजकीय वरदहस्त आणि बड्या नेत्यांशी मैत्री असल्यामुळे एखादा चार्टर्ड अकाउंटंट अध्यक्ष होणार की २९ कसोटी सामने खेळणारा आणि आपल्या अख्ख्या कारकिर्दीत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत असणारा संदीप पाटील अध्यक्ष होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.
संदिप पाटील यांनी वयाची पासष्टी पार केल्यानंतरही चाहत्यांमध्ये स्वत:ची ‘ग्लॅमरस’ प्रतिमा जपली आहे. संदीप पाटील यांनी स्वतः बरोबरच आपला मुंबईकर सहकारी, कसोटीवीर वेगवान गोलंदाज राजू कुलकर्णी यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये उतरण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन मधील निवडणूक ही राजकीय नेत्यांचे बगलबच्चे विरुद्ध भारतासाठी आणि मुंबईसाठी खेळलेले क्रिकेटपटू यांच्यामध्ये रंगणार याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक यंदा खूपच प्रतिष्ठेची होणार आहे. न्यायमूर्ती लोढा समितीने पदाधिकाऱ्यांना वयाची आणि कार्यकाळाची अट घातल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यातच खेळाडूंच्या संघनिवड प्रक्रियेमध्ये झालेली मोठ्या प्रमाणातील वशिलेबाजी, आर्थिक गैरव्यवहार, खजिनदारांवर आलेला आर्थिक घोटाळ्यांचा ठपका, संघटनेच्या ज्येष्ठ माजी पदाधिकाऱ्यांत घुसलेला परिवारंवाद या पार्श्वभूमीवर ही निवडणूक वादळी होणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये गेल्या काही काळात बड्या राजकीय नेत्यांचे चेले मोठ्या प्रमाणात घुसले आहेत. त्यामध्ये आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संजय नाईक, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर आणि माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास मित्र आणि चार्टर्ड अकाउंटंट अमोल काळे या तिघांनाही संघटनेमध्ये मोठी स्वप्न पडू लागली आहेत.

हेही वाचा : 

सोमवारपासून मुंबईसह ठाण्यात जोरदार पावसाचा अंदाज

निवडणुकीच्या आधी अमोल काळे आणि मिलिंद नार्वेकर यांना आपण अध्यक्ष व्हावं अशा स्वरूपाचे वेध लागले होते. यापैकी अमोल काळे हे एमसीएसाठी काही ही योगदान नसताना उपाध्यक्ष आहेत तर मिलिंद नार्वेकर हे शरद पवारांच्या आशिर्वादाने मुंबई प्रीमियर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख आहेत अशी शेलार यांचे निकटवर्तीय संजय नाईक हे एमसीएच्या सचिव या पदावर कार्यरत आहेत. त्यांची कारकीर्द ही बरीचशी वादग्रस्त ठरलेली आहे. मुंबईच्या मैदान क्रिकेटशी समरस असलेल्या या पदाधिकाऱ्याने आपल्या संपूर्ण कार्यकाळात अनेक घेतलेले निर्णय हे त्यांच्यावरील तसेच त्यांचे मार्गदर्शक असलेल्या भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरील टीकेसाठी कारणीभूत ठरलेले आहेत. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असूनही अमोल काळे आणि संजय नाईक हे या निवडणुकीत अडचणीत येतील असे संकेत संदीप पाटील आणि राजू कुलकर्णी यांच्या उमेदवारीनंतर वाटू लागलेले आहेत.

गेल्या काही काळात मुंबई क्रिकेट असोसिएशन खेळाडूंच्या निवडीतली वशिलेबाजी, बड्या क्रिकेटपटूंच्या मुलांसाठी गुणवत्तावान क्रिकेटपटूंना संघाबाहेर ठेवण्याची पद्धत, आर्थिक बेशिस्त आणि मोठ्या माजी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मुलांचे उच्चशिक्षण परदेशात झालंय यासाठी चोखाळलेला परिवारवाद यामुळे मैदान क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. येणाऱ्या काही काळात मुंबई क्रिकेट असोसिएशन कडे बोर्डाकडून येणाऱ्या आर्थिक मदतीचा प्रचंड मोठा ओघ सुरू होणार आहे. सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वाट्याला येणाऱ्या मोजक्या आर्थिक निधीमध्येच गोंधळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये अनेक वर्ष गटातटांचे राजकारण सुरू असलं तरी त्याला हाणामारी किंवा असभ्यतेचे पदर कधीच नव्हते. मात्र गेल्या काही महिन्यात पदाधिकाऱ्यांमधील सत्तेची लालसा इतकी पराकोटीला गेलेली आहे की प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एमसीएच्या कार्यालयाच्या परिसरातच अर्वाच्य शिवीऊ करत एकमेकांच्या गचांडी धरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे इतर स्थानिक खेळांसारख्याच क्रिकेटच्या देशातील या अत्यंत महत्त्वाच्या संघटनेमध्ये झुंडशाही आणि गुंडागर्दी घुसू पाहते आहे का असा प्रश्नही माजी खेळाडूंना भेडसावू लागलेला आहे.त्यामुळेच निवृत्त झालेल्या, संघटन कौशल्य असलेल्या किंवा करिष्मा असलेल्या अनुभवी माजी खेळाडूंनी असोसिएशनच्या कल्याणासाठी पुढे येणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाचा मतप्रवाह एमसीए मध्ये दिसून येत आहे. त्यानुसारच काही ज्येष्ठ मंडळींनी भारताचे माजी तडाखेबंद फलंदाज संदीप पाटील यांना एमसीएच्या निवडणुकीत उतरण्याची विनंती केली.

शिवसेना व शिंदे गटातील वादानंतर आज दादर पोलीस स्टेशनबाहेर राडा

सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर विजय पाटील आहेत. डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा असलेले डॉक्टर विजय पाटील हे गेली अनेक वर्ष मुंबई क्रिकेटच्या वर्तुळात कार्यरत आहेत. मात्र त्यांना आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवता आला नाही. त्यांचे घेतलेले काही निर्णय हे एमसीए पेक्षा नवी मुंबईच्या डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या हिताचेच ठरलेले आहेत. त्यामुळे हा त्यांचा कार्यशालीचा भाग त्यांना निवडणुकीत अडचणीचा ठरू शकतो.मुंबई क्रिकेट असोसिएशन मधून राजकीय नेत्यांना लोढा समितीमुळे पायउतार व्हावं लागलं असलं तरी संघटनेतील बहुतांश निर्णय हे राजकीय नेते मंडळीच घेत असतात. त्यातही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अत्यंत आघाडीवर असतात. वयाच्या ८२ व्या वर्षी देखील शरद पवार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कामकाजामध्ये लक्ष ठेवून असतात. शरद पवार हे रविवारी भाजपचे नेते आशिष शेलार, बोर्डाचे माजी सीईओ असलेले प्राध्यापक रत्नाकर शेट्टी यांच्याबरोबर मुंबई क्रिकेटच्या संदर्भातील निवडणुकीची रणनीती वांद्र्याच्या बीकेसी मधील शरद पवार क्रिकेट सेंटरमध्ये बसून ठरवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांचे पीए असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला क्रिकेट प्रशासनातील महत्त्वाच्या पदावर काम करायला मिळावं अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांना उपाध्यक्ष किंवा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रुची असल्याचं एमसीएतील सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र शरद पवारांनी त्यांना कोणत्याही स्वरूपात आश्वासन दिलेलं नसून एमसीएच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी बाबतचा निर्णय हा सामूहिक स्वरुपात स्वरूपात घेतला जाईल असं सुचवलं होतं. एमसीएच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी माजी कसोटीपटूंनी अर्ज दाखल केल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील डी वाय पाटील एज्युकेशन हबचे प्रमुख विजय पाटील हे संदीप पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढणार की भारतीय क्रिकेट नियमक मंडळ मंडळात पवार-शेलार यांच्या सहमतीने जाणार याकडेही क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये संदीप पाटील बाजी मारू शकले तर माजी कसोटी वीर माधव मंत्री यांच्यानंतर एमसीएच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ते दुसरे क्रिकेटपटू ठरू शकतील. याआधी माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि अजित वाडेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपलं नशीब अजमावून पाहिलं होतं. मात्र राजकीय नेत्यांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही.

आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात आज औरंगाबादमध्ये शिक्षकांचा भव्य मोर्चा

डॉक्टर विजय पाटील हे देखील अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके असलेले पण मुंबईच्या क्रिकेटमध्ये काहीही योगदान नसलेले अमोल काळे हे जर सत्तेच्या आणि राजकीय जोराच्या भरवशावर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होऊ शकते. शरद पवार हे आपल्या क्रीडा प्रेमाबद्दल परिचित आहेत. मुंबई क्रिकेटमध्ये क्रिकेटचा बोजवारा उडाला असताना संदीप पाटील सारख्या मोठ्या क्रिकेटपटूला असोसिएशनच्या कामकाजामध्ये सहभागी करण्याची उत्तम संधी पवार आणि शेलार यांच्याकडे निर्माण झाली आहे. हे दोन्ही मोठे नेते खेळाडूंसाठी असोसिएशनच्या दरवाजे उघडणार की आपल्या राजकीय चेल्यांनाच महत्त्वाच्या खुर्च्यांवर बसवणार याकडे मुंबईच्या नव्हे तर राज्याच्या क्रिकेट वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version