एक लढाई… मुलांचं ऑनलाईन लैंगिक शोषण थांबवण्याची !

- महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोग आणि चाईल्डफंड इंडियाचा उपक्रम - ⁠चाईल्डफंड इंडिया व बालहक्क संरक्षण आयोग यांच्यात सामंजस्य करार - ऑनलाईन लैंगिक शोषणाबाबत निर्माण करणार जागृती

एक लढाई… मुलांचं ऑनलाईन लैंगिक शोषण थांबवण्याची !

लहान मुलांना जगभरातल्या ज्ञानाची कवाडं खुली करण्यात आणि शिक्षणाची गंगा सर्वदूर पोहोचवण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या इंटरनेटमुळे लहान मुलांविरोधातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यातूनच ऑनलाईन माध्यमातून होणारं लहान मुलांचं लैंगिक शोषण ही जागतिक समस्या ठरत आहे. या समस्येशी लढण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि चाईल्डफंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एक योजना आखण्यात आली आहे. ‘वेब सेफ अँड वाईज’ (WEB Safe & Wise)असं या उपक्रमाचं नाव असून पुढील वर्षभर हा उपक्रम चालणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर बुधवारी सह्या करण्यात आल्या.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही पोर्नोग्राफिक साईट्सच्या माध्यमातून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. याबाबतची ठोस आकडेवरी उपलब्ध नाही. मात्र हे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी, त्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि या लैंगिक शोषणाबाबत आकडेवारी गोळा करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि चाईल्डफंड इंडिया यांनी एकत्रित योजना आखल्याची माहिती राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी दिली. सदर उपक्रमांमध्ये चाइल्डफंड इंडियाचे राजेश रंजन सिंग- बोर्ड मेंबर (चाइल्डफंड इंडिया),
अमरकुमार सिंग- वरिष्ठ व्यवस्थापक कार्यक्रम(चाइल्डफंड इंडिया) आणि महिला व बालहक्क संरक्षण आयोगाचे
डॉ.भालचंद्र चव्हाण – ॲड. निलिमा चव्हाण इतर अनेक सदस्य उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे राज्यात ऑनलाईन लैंगिक शोषणाची परिस्थिती काय आहे, याचा विस्तृत अभ्यास होणार आहे. त्याशिवाय हे गैरप्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावरही अभ्यास होईल. असे प्रकार घडल्यास त्यावर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, त्यांना याबाबत प्रशिक्षण देणे, अशा गोष्टींचा समावेश या उपक्रमात असेल. त्याचप्रमाणे जनजागृतीचे उपक्रमही राबवण्यात येतील, असे ॲड. शाह यांनी सांगितले.

ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचार तसेच ऑनलाईन सुरक्षितता या विषयांवर मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी शाळा आणि विविध संस्थांमध्ये प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी चाईल्डफंड इंडिया (Chiled Fund Indea) या संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.

हे ही वाचा:

राजकीय वर्तुळात आता येणार नवे वळण ; VASANT MORE घेणार ठाकरेंची भेट !

MAHARASHTRA LEGISLATIVE COUNCIL ELECTION 2024 : विधान परिषदेत १५ आमदार होणार निवृत्त ; नवे तीन सदस्य निवडणूक जिंकून परतणार सभागृहात
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version