OCCRP च्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठा बदल …

ओसीसीआरपी (OCCRP) ने अदानी समुहातील (Adani Group) गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात (stock market) उमटले.

OCCRP च्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठा बदल …

ओसीसीआरपी (OCCRP) ने अदानी समुहातील (Adani Group) गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात (stock market) उमटले. अदानी समुहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांच्या आसपास घसरण पाहायला मिळाली. अदानी समुहाने मॉरिशस कनेक्शनद्वारे निनावी गुंतवणूक करुन, स्वतःचं भांडवली बाजारमूल्य वाढवल्याच्या ताज्या आरोपानंतर भारतीय बाजारात अदानी समुहाच्या शेअर्सला मोठा फटका बसला. अदानी समुहाने ओसीसीआरपीचे (OCCRP) आरोप स्पष्टपणे फेटाळल्यानंरही ही घसरण थांबलेली नाही. मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) अदानी ग्रीन एनर्जीच्या (Adani Green Energy) शेअरमध्ये तब्बल ४.४३ टक्क्यांची घसरण नोंदली केली. ओसीसीआरपीच्या अहवालानंतर गुंतवणूकदारांनी अदानी समुहाच्या शेअर्सची जोरदार विक्री केली. अदानी समुहाचं स्टेटमेंट जारी झाल्यानंतर त्यात थोडी सुधारणाही नोंदवण्यात आली. सध्या अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये ३.४५ टक्के एवढी तूट आहे. हा शेअर सध्या ९३६ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

अदानी पॉवर्सच्या शेअरमध्येही ३.८२ टक्के एवढी घसरण नोंदवली गेली. दुपारनंतर त्यातही थोडी सुधारणा दिसून आली. सध्या ही घसरण सव्वा दोन टक्क्यांच्या जवळ आहे, तर किंमत ३२१ रुपये एवढी आहे. अदानी समुहाची मुख्य कंपनी म्हणजे फ्लॅगशिप फर्म (Flagship Firm) असलेल्या अदानी एंटरप्राईजेसच्या शेअरमध्येही (Adani Enterprises Ltd) तीन टक्क्यांएवढी घसरण असून सध्या हा शेअर रुपये २४३५ वर ट्रेड करत आहे. अदानी समुहातीलच अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा (Adani Energy Solutions) शेअरही ३.१८ टक्क्यांच्या घसरणीने ८१४ रुपयांवर फेकला गेला होता. त्यात नंतर सुधारणा होऊन तो ही पावणेतीन टक्क्यांच्या घसरणीसह ८१८ ते ८१९ दरम्यान ट्रेंड करत आहे.

अदानी समुहातील उर्जा क्षेत्राशिवाय अन्य कंपन्यातील शेअरमध्येही विक्रीचा मारा पाहायला मिळाला. अदानी पोर्ट्स आणि एसईझेडच्या (Adani Ports & SEZ) शेअरमध्ये तीन टक्क्यांची घसरण नोंदली गेली. हा शेअर ७९३ पर्यंत खाली गेला. अदानी टोटल गॅसचा (Adani Total Gas) शेअरही ६३५ रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे. अदानी विल्मरच्या (Adani Wilmar) शेअरमध्ये अजूनही घसरण कायम आहे. अदानी विल्मरचा शेअर दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह ३६१ रुपयांवर ट्रेड करत आहे. अदानीच्या ताब्यातील वृत्तवाहिनी एनडीटीव्हीचा (New Delhi Television Ltd) शेअर २१४ रुपयांवर ट्रेड करत आहे तर सिमेंट कंपनी एसीसीचा (ACC Ltd) शेअर, पावणेदोन टक्क्यांच्या घसरणीसह १९६५ रुपयांवर ट्रेड करत आहे. अदानी समुहाच्या ताफ्यातील आणखी एक सिमेंट कंपनी अंबुजा सिंमेटचा (Ambuja Cements Ltd) शेअरमध्ये आधी तीन टक्क्यांची घसरण नोंदली गेली होती. आता ती वाढून चार टक्क्यांवर आली आहे. अंबुजा सिमेंटचा शेअर सध्या ४२६ वर ट्रेड करत आहे. ओसीसीआरपीच्या आरोपानंतर अदानी समुहाच्या सर्व दहा शेअरमध्ये आज घसरण नोंदवली गेली. दुपारनंतर त्यात काही सुधारणा झाली असली तरी अंबुजा सिमेंट आणि अदानी विल्मरमधील घसरण थांबलेली नाही. ओसीसीआरपीच्या सर्व आरोपांचं अदानी समुहाने खंडन केलं आहे. हिंडनबर्ग रिसर्च या शॉर्टसेलर फर्मने केलेल्या आरोपासारखेच हे जुने तसंच बिनबुडाचे आरोप असल्याचा दावा अदानी समुहाने केला आहे. यासर्व आरोपांमधून तब्बल दहाएक वर्षांपूर्वीच क्लीनचिट मिळाल्याचा दावा अदानी समुहाने केला आहे. गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखालील तज्ञ समितीनेही हे आरोप सिद्ध करण्याएवढे पुरावे नसल्याचं स्पष्ट केल्याचंही अदानी समुहाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

हे ही वाचा: 

देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा, नाना पटोले यांचं खोचक वक्तव्य

रेल्वे मंडळाने घेतला मोठा निर्णय, ‘या’ कालावधीत होणार डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version