Sangli News : गौतमी पाटील यांची लावणी, प्रेक्षकांचा धिंगाणा मात्र भूर्दंड जिल्हा परिषद शाळेला

Sangli News : गौतमी पाटील यांची लावणी, प्रेक्षकांचा धिंगाणा मात्र भूर्दंड जिल्हा परिषद शाळेला

मिरज तालुक्यातील बेडग गावातील लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी सुरु असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन बेडग इथं करण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे येथील शाळेच्या जवळच लावणी कार्यक्रमांचं व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. यावेळी प्रेक्षकांनी शाळेच्या छतावर आणि झाडावर बसून लावणी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. पण याचा फटका झाडासह शाळेलाही बसला.

मिरज तालुक्यातील बेडग इथल्या जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे पटांगणात लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लावणी कार्यक्रमात इतकी गर्दी जमली की मैदान कमी पडले. मग काही प्रेक्षकांनी जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र यात जिल्हा परिषद शाळेच्या कौलारु छताचा चुराडा झाला. त्यामुळे आता शाळेच्या नुकसानीला जबाबदार कोणं, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरलही झाले आहेत. विशेष म्हणजे चक्क शाळेतील शिक्षकच या कार्यक्रमात ठुमके लगावताना दिसलाय.

नेमकं काय घडलं?

बेडग इथल्या एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावचे नाव देशात गाजवणार्‍या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचं नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरुन तिचे चाहते आले होते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या पटांगणात तुफान गर्दी झाल्याने काही प्रेक्षक हे शाळेच्या कौलारु छतावर जाऊन नृत्याचा ताल धरु लागल्याने कौलांचा चुराडा झाला.

डान्स आणि कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत

सोशल मीडियाने गौतमी पाटीला प्रसिद्धी मिळवून दिली. आपला डान्स आणि एक्प्रेशनने अनेक तरुणांना वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली ती तिच्या डान्स आणि कॉन्ट्रोवर्सीमुळे. खरंतर सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना गौतमीने असे काही डान्स स्टेप्स केले आहेत की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. ज्यानंतर गौतमीने लोकांची माफी देखील मागीतली.

Exit mobile version