spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Valentines Day 2023, व्हॅलेंटाईन डे आणि ती…

आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर होत आहे. हि पोस्ट साम टीव्ही चे पत्रकार प्रशांत सागवेकर यांची आहे.

आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर होत आहे. हि पोस्ट साम टीव्ही चे पत्रकार प्रशांत सागवेकर यांची आहे.

या पोस्ट मध्ये त्यांनी म्हंटल आहे कि, आज जागतिक प्रेम दिवस.. त्या अनुषंगाने खूप दिवसांनी प्रेम या संकल्पनेवर आधारीत पोस्ट लिहितोय. फेब्रुवारी महिना सुरु झाला की आपल्याकडे हे प्रेमाचे वारे वाहू लागतात. एकतर हा आपला भारतीयांचा म्हणावा असा दिवस नाही, पाश्चिमात्य संस्कृतीमधून आपण घेतलेला एक दिवस किंवा डे.. आज साजरा करण्यात येणारा व्हॅलेंटाईन डे हा एका प्रेमाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रेमवीराच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. साधारणपणे आजपासून १७०० वर्षापूर्वी तिसऱ्या शतकात रोममध्ये व्हॅलेंटाईन नावाचा एक सेन्ट अर्थात संत होऊन गेला. त्यावेळी रोममध्ये क्लॉडियस दुसरा या राजाचे राज्य होतं. या राजाला जग जिंकण्याची मनिषा होती. त्यामुळे सतत युद्ध करणे हा याचा छंद होता किंवा सवय होती. क्लॉडियसला एक लक्षात आले की लग्न न झालेले सैनिक हे लग्न झालेल्या सैनिकांपेक्षा अधिक धाडसी असतात, शूर असतात. त्यावेळी त्यानं एक फर्मान काढलं. आपल्या राज्यात आता लग्न करण्याला, प्रेम करायला बंदी आहे. तसंच प्रेम करणाऱ्यांचाही त्याला राग यायचा. त्याच राज्यात हा व्हॅलेंटाईन नावाचा संत राहायचा. प्रेम करणाऱ्या तरुण तरुणींचं तो गुप्तपणे लग्न लावायचा. याची खबर क्लॉडियसला लागताच त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकले. क्लॉडियलच्या मते, हा भयंकर गुन्हा होता. पुढे तुरुंगात असताना व्हॅलेंटाईनचा जीव तुरुंग अधिकाऱ्याच्या मुलीवर आला, त्यांचं प्रेम जुळलं. याची माहिती लागताच खवळलेल्या क्लॉडियसने व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा देण्याचे फर्मान काढलं. व्हॅलेंटाईनला १४ फेब्रुवारी या दिवशी फाशी देण्यात आली आणि त्या दिवसापासून हा व्हॅलेंटाईन डे अस्तित्वात आला असं म्हणतात…

प्रेमाच्या उत्कट भावनेचं प्रतिक, ज्यांना आपलं प्रेम व्यक्त करता येत नाही अशा तरुणांसाठी किंवा तरुणींसाठी असलेला एक दिवस, आज एखादीला त्याने किंवा एखाद्याला तिन असंही म्हणूया कारण आज तरुणीही बिनधास्तपणे आपल्या आवडत्या तरुणाला प्रेमासाठी आर्जव करतात. अशा प्रेमीयुगुलांसाठी असणारा आजचा हा दिवस आहे. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. परिक्षेच्या रिझल्टच्या दिवशी कसं अनेकांचे धाबे दणाणलेले असतात, तसं काहीसं आज अनेकांच्या मनाची अवस्था असते. अनेकांना आदल्या रात्री झोपही लागत नाही, आठ आठ दिवस आधी तयारी करुन सुद्धा काहीतरी कमी राहिल्याची भावना मनात असतेच आणि मग ती समोर आली की जी काही ततपप होते त्याचं वर्णन असं शब्दात करण्यात काहीही अर्थ नाही ते प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मज्जा आहे. जी आवडते तीचा होकार मिळविण्यासाठी काय करावं यासाठी अनेकांचे सल्ले पण घेतले जातात (पण सावधान.. ते वर्क होतीलच याची गॅरेंटी नाही.) मग अशावेळी एकच आधार उरतो, आणि तो म्हणजे प्रेमाचा आयकॉन.. शाहरुख खान.. पाहा त्याचे सिनेमे, पाहा त्याची स्टाईल, पाहा त्याची गाणी, पाहा त्याचे कपडे आणि निदान ते तरी कॉपी करुन, काही घडेल अशी अपेक्षा असते.. एकीकडे मनाची ही अवस्था तर दुसरीकडे अनेक पद्धतीचे व्यत्यय आहेतच. १४ फेब्रुवारी जवळ यायला लागला की आमच्याकडे आई-वडिलांचे प्रेम, भावा बहिणीचं प्रेम, मित्रांचे प्रेम, मैत्रिणींचे प्रेम आणि कोणत्या कोणत्या नात्यातील प्रेमांना ठासून ठासून सांगण्याचा एक वेगळाच आटापिटा दिसतो.. फेसबुक,व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून असे काही प्रबंध लिहून येतात की बिचारे आमचे प्रेमवीर आपण काहीतर फार मोठं पाप, गुन्हा करायला जातोय आणि आता आपल्याला बहुतेक फासावरच लटकवतील व्हेलेंटाईन सारखं एवढं बिथरतात. त्यातून ती एवढी आवडत असते, की आपल्याकडून उशीर झाला आणि दुसरच कोणी सत्ता मिळवली तर काय अशा विवंचनेत डोक्याचा भूगा झालेला असतो.

मित्रांनो आजचा दिवस प्रेमी युगुलांचा आहे. ज्यांना एकमेकांची आयुष्यभरासाठी साथ हवीय, ज्यांना निसर्गाने दिलेलं स्त्री पुरुष नावाचं वरदान पहिल्यांदा अनुभवायचं आहे, त्यांचा आहे, पण हे सगळं करत असताना आपल्या भारतीय समाजानं घालून दिलेल्या प्रेम व्यक्त करण्याच्या चौकटी मात्र पाळायलाच हव्यात, त्यात दूमत नाही.. वय वर्ष 18 पासून पुढे प्रेम या संकल्पनेचा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या मनात गुंजारव सुरु होतो.. खरच ही एक अशी भावना आहे ज्यात आदर आहे, ज्यात कमालीची माया आहे, ज्यात निरपेक्षपणाची जाण आहे, ज्यात फक्त देणं आहे, वाट पहाणं आहे, तासनतास कोणताही विषय नसताना बडबड करणं आहे, फिरणं आहे, निसर्गाच्या सान्निध्यात वावरण आहे. ही भावना त्याची आणि तीची आहे, फक्त दोघांची आहे. व्हेलेंटाईन संत हा या प्रेमी युगुलांना एकमेकांची साथ मिळावी हे प्रयत्न करत असताना फासावर चढला या संकल्पनेला ओळखा. त्या मागची भावना ओळखा.

प्रेमी युगुलांनी देखील समजून घेतलं पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी एमकेमांच्या शरीरासोबत चाळे करत बसणं म्हणजे प्रेम असं जर काही संकल्पना तुमच्या डोक्यात असली तर ती आधी काढून टाका. प्रेम ही दाखविण्याची नाही, अनुभविण्याची क्रीया आहे. ती एकाचवेळी दोन मनात रुजते, तीला संवादातून खतपाणी मिळतं, प्रेमाचा वृक्ष भेटीगाठी, चर्चा, इच्छा अपेक्षांची देवाण घेवाण, वेगवेगळी सरप्रायझेस, एकमेकांवनर उधळणी जाणारी स्तुतीसुमनं, एकमेकांची पारख, विश्वास, एकमेकांबद्दलची मानसिक आणि शारिरीक ओढ यातून बहरत जातो. हे सगळं होत असताना, चित्रपट, मालिका, कथा, कादंबऱ्या यातून व्यक्त होणारं प्रेम आणि वास्तव जीवनातलं प्रेम यात असणारा जमिन असमानाचं अंतर प्रेमीयुगुलांनी पहिलं समजून घेतलं पाहिजे. चित्रपटाला नेहमी लार्जर दॅन लाईफ असं म्हटलं जातं. त्यात होणाऱ्या मारामाऱ्या खऱ्या असतात का ? एक व्यक्ती एकाचवेळी शे-दोनशे लोकांसोबत फाईट करु शकते का ? घरातल्या बायका दिवसभर नटून समजू मेकअप करुन उंची साड्या, ड्रेसेस घालून घरात वावरू शकतात का ? ट्रेन, बस, ट्रॅफिक, सार्वजनिक ठिकाणांवर वावरून गाणी गात डान्स करता येतात का ? नाही ना.. ते खोटं असतं हे माहिती आहे ना.. चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेते यांनी मनोरंजनासाठी कल्पनेतून उभी केलेली एक वेगळी दुनिया म्हणजे चित्रपट याची जाण आहे ना आपल्याला ?

मग त्याच चित्रपटात प्रेम व्यक्त करण्याच्या ज्या काही अवास्तव घटना दाखवल्या जातात, दृष्य दाखवली जातात, फक्त त्याच तुम्हाला खऱ्या का वाटतात..(आता काही चित्रपटांमधून वास्तवातील घटनांसारखचं चित्रण केलं जातं तो भाग वेगळा) तसे वास्तव जीवनात वागण्याचा प्रयत्न का करता ? त्या घटना, ती दृष्य सुद्धा मनोरंजानाचा एक भाग आहेत हे जाणून घेऊन तिथेच त्याला पूर्णविराम का देत नाही ? मित्रांनो ते जे पडद्यावर घडतं ते तसंच्या तसं आपल्या वास्वव आयुष्यात काहीही नसतं हे सत्य स्विकारा. कारण ती एक फॅन्टसी आहे ती तुम्हाला तुमच्या वास्तव जीवनात घडवावी लागेल, घडणार नाही याचं भान बाळगा.. समाजबंधनाच्या चौकटी समजून घ्या. प्रत्येकाच्या स्वभावानुसार, विचारांनुसार, आवडी निवडी नुसार, वयानुसार, शारीरीक आकर्षणातून निर्माण होणारी प्रेम भावना वेगवेगळी असते, ती व्यक्ती सापेक्ष आहे. त्याने असं केलं म्हणून याने पण तसच केलं असं होत नाही, तसं करुही नका.. मुलींचं सौदर्य आणि मुलांचं पुरुषीपण हे तुम्ही आम्ही नाही निसर्गाने तयार केलय आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं मुख्य कारण आहे प्रजोत्पादन.. मानवाचं अस्तित्व टिकून रहावं, नवनविन टॅलेंट जन्म घ्यावं, मनुष्याचं अस्तित्व त्रिकालाबाधीत रहावं असं वाटत असेल तर स्त्र पुरुष संबंधातून संतती निर्माण होणं हा एकच पर्याय आहे (दुसरा कोणता असला तर मला तरी माहिती नाही.) हे आकर्षणच जर संपलं तर नवी पिढी जन्म कशी घेईल ? स्त्रीकडे पुरुषाने आकर्षित होणं, त्याला तीच्या सोबत शरीर संबंध प्रस्थापित करु वाटणं ही नैसर्गिक भावना आहे. आदम आणि इव्हच्या मिलनातूनच आपण सगळे जन्मलोय. स्त्रीयांना नव्या जीवाला जन्म देण्याचा अधिकार, रचना निसर्गानं बहाल केलीय मानवानं नाही. अनेक स्त्रीया आज मातृत्वही नाकारतानाही दिसतायत त्यांनी हा निर्णय घेण्याआधी कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा की असं करण त्याच्या शरीरासाठी कसं आणि किती हानिकारक असतं. त्याचे काय परिणाम होतात, त्याच्या शरीर रचनेच कसे बदलत होत जातात आणि वय वाढल्यानंतर काय होतं याचा अभ्यास करावा किंवा माहिती घ्यावी. हे सगळं मी काही नव्याने सांगत नाहीय, तुम्हीलाही सगळ्यांना हे माहिती आहे..

या लेखनातून मला एकच गोष्ट ठासून सांगावीशी वाटते, आजचा दिवस त्या दोघांचा आहे, एकत्रीतपणे आयुष्याची सुरुवात करु पाहणाऱ्या युगुलांचा आहे. १७०० वर्षांपूर्वी त्यांच्या प्रेमाला स्वत:च्या स्वार्थासाठी एका राजानं कायमचं संपवलं, व्यक्ती संपल्या.. पण प्रेम संपलं का ? नाही.. ते असचं अनादी अनंत काळापासून सुरु होतं, आहे आणि राहिल. समाज व्यवस्थेनं सुद्धा त्याचा आदर करावा. प्रेमी युगुलांनी सगळ्यात आधी आपलं करीयर, नोकऱ्या, व्यवसाय याकडे लक्ष केंद्रीत करावं. मी कसं वागाचं ते मी ठरवेन हे जरी खरं असलं तरी आपण समाजव्यवस्थेत राहणारे आहोत, कुटुंबव्यवस्थेत राहणारे आहोत याचं भान हवच. सार्वजनिक ठिकाणी वावरताना बंधनं पाळावीत. जाणा येणाऱ्या नागरिकांनाही लाज वाटेल असं वर्तन करु नये. चित्रपटांतील अवास्तव संकल्पना खाजगी जीवनात घूसडून आयुष्याची वाट लावू नका. मुलगी ही सुद्धा तुमच्या सारखीच एक माणूस आहे. तीलाही विचार आहेत, भावना आहेत, तीलाही चॉईस आहे आणि त्याही पलिकडे जाऊन मी असं म्हणेन की प्रेम नाकारणं आणि स्विकारणं हे पूर्णत: मुलीच्याच हातातच आहे, तुमच्या जोर जबरदस्तीनं काहीही होणा नाही, उलट जीच्या मनात नसताना जर तुम्ही तीच्या किंवा त्याला आपल्या प्रेमाचा स्विकार करण्यासाठी भाग पाडत असाल तर तुम्ही अनावश्यक कलहांना जन्म देताय हे लक्षात घ्या. मुलींच्या भावनांचा, निर्णयाचा आदर करा आणि प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या व्हेलेंटाईनला खऱ्या अर्थाने आदरांजली द्या… तरच व्हेलेंटाईन डे साजरा झाला असं म्हणता येईल…

हे ही वाचा : 

BBC ला डॉक्युमेंट्री पडली महागात ? देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss